SHARE
रात्री बायको बरोबर गाडी वरुन घरी जाताना
ती खोडकर आवाजात सांगू लागते
आमच्याच घरच्या खाणाखूणा…
‘ हां.. आता इथून डावीकडे… आता सरळ..
त्या मारुती पासून उजवीकडे वळा..
थोडी पुढे घ्या अजुन… पांढर्‍या गेटपाशी थांबवा…
हां… बास बास… इथेच… ‘
आणि मग उतरत, पर्स काढत
विचारते हसत हसत – ‘ हां… किती झाले ? ‘
८४ लक्ष तर झालेच की प्रीये !
हा तरी शेवटचा की नव्या जन्मवर्तुळाचा हा प्रारंभ … ठाउक नाही !
गतजन्माचे आठवत नसेलही काही आपल्याला,
पण तेंव्हाही असतील असेच तुझे जन्मप्रामाणिक हसरे क्षण
आणि माझे अंतःस्थ उदासीन प्रश्न काही !!
आता पर्स काढलीच आहेस तर ठेव हातावर
एखादी साखरहळवी टॉफी…
गोड चविने सरु दे अजुन एक रात्र…
अंधारातच चढायचा आहे एक एक जिना…
हातात हात तेवढा राहू दे फक्त….

1 COMMENT

LEAVE A REPLY